Ad will apear here
Next
पुस्तकसिद्धी!
ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र गुर्जर त्यांच्या ‘किमया’ या सदरात आज लिहीत आहेत अनोख्या अशा ‘पुस्तकसिद्धी’बद्दल...
............
विज्ञानलेखक निरंजन घाटे माझा जुना मित्र. विविध विषयांवर त्यानं अतिविपुल लेखन केलेलं आहे. प्रकाशित पुस्तकांची संख्या २००पर्यंत पोहोचलेली. त्याच्या घरी गेलं, तर बसायला जागाच नसते. टेबल-खुर्च्या आणि जमीन पुस्तकं आणि नियतकालिकांनी ओसंडत असते. ‘कुठे बसू’ असं विचारलं, तर तो सांगतो, की ‘जागा करून घे आणि कुठेही बस.’

वकील, डॉक्टर आणि कर सल्लागार यांच्या घरी काचेच्या कपाटांमध्ये, बाइंडिंग केलेली जाड-जाड पुस्तकं पाहिली, की लहानपणी खूप छान वाटायचं. त्यात भरलेलं सगळं ज्ञान त्या त्या लोकांच्या डोक्यात पक्कं मुरलेलं असणार, याबद्दल परमादर वाटायचा. वडील विक्रीकर सल्लागार असल्यामुळे आमच्या घरीसुद्धा तीच परिस्थिती होती. त्याशिवाय रामायण-महाभारतादि धार्मिक वाङ्‌मय, पोथ्या आणि ज्योतिषविषयक पुस्तकं भरपूर होती. प्रसिद्ध लेखक भा. द. खेर माझे मामा. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या कथा-कादंबऱ्यासुद्धा संग्रहात होत्या. ‘स्वामी’-‘ययाती’च्या सवलत योजना सुरू झाल्यापासून घरात पुस्तकांची भरच पडत गेली. आजमितीला अगदी घाट्यांसारखी नसली, तरी जवळजवळ तशीच स्थिती आमच्या घरातही आहे. चार माणसं येणार असतील, तर आदल्या दिवशी आवराआवरी करायला किमान दोन तास लागतात. तीन-चार दिवस गेले, की पुन्हा घर ‘जैसे थे!’ तो पसारा एवढा आहे, की त्यासाठी योग्य फर्निचर बनवणं खर्चामुळे अशक्य आहे आणि एखादं विशिष्ट पुस्तक हवं आहे, ते घरात निश्चितपणे आहे; पण वेळेवर सापडणं महाकठीण! त्यापेक्षा ते नवीन आणणं ‘परवडतं!’ घरातल्या बायकांनी परस्पर, न विचारता केलेली आवराआवर हे त्याचं कारण असतं. बाबा आमटे म्हणायचे, की ‘माझ्या प्रचंड अशा अव्यवस्थेत माझी म्हणून एक व्यवस्था असते. त्यामुळे मला हवी असलेली गोष्ट लगेच मिळू शकते. कोणी आवराआवर केली, तर सगळाच सावळागोंधळ उडतो.’

आपले माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची मरणोत्तर मालमत्ता होती, हजारो पुस्तकं, त्या व्यतिरिक्त काहीही नाही. डॉ. रा. चिं. ढेरे यांची तीच परिस्थिती! आता त्यांच्या स्मरणार्थ एक ग्रंथालय उभं राहत आहे. बदलापूरला श्यामसुंदर जोशी यांनी स्वकष्टातून उभारलेलं, सुमारे दोन लाख पुस्तकांचं ‘ग्रंथसखा वाचनालय’ म्हणजे मोठमोठ्या विद्यापीठांनाही लाजवेल असं ज्ञानभांडार आहे. असे ग्रंथप्रेमी जगात खूप आहेत. एक-एक पुस्तक त्यांनी चोखंदळपणे जमा केलेलं असतं. कोणतंही दुर्मीळ पुस्तक लोकांना देताना जीव गलबलत असतो. आपल्या पश्चात त्या सगळ्या ‘खजिन्या’ची काय वाट लागणार, याची चिंता त्यांना भेडसावत असते. कोणत्या संस्थेला किंवा ग्रंथालयांना ती भेट म्हणून द्यावीत, याची आधीच (वेळेवर) व्यवस्था करावी लागते. बऱ्याच ठिकाणी त्यांची नीट व्यवस्था लावली जातेच असं नाही. तथापि, निदान त्या वास्तूंमध्ये ग्रंथ निदान सुरक्षित तरी असतात. त्यांचं महत्त्व जाणणारा वाचक/संशोधक कधी ना कधी त्यांचा उपयोग करतोच.

ग्रंथप्रेमी लोकांना बहुमूल्य, दुर्मीळ पुस्तकं कुठे मिळतात हे चांगलं ठाऊक असतं. पुण्यात असे १२-१५ विक्रेते आहेत. काही जण तर रस्त्यावर बसतात. त्यांचे ‘व्हॉट्सअॅप ग्रुप्स’ आहेत. नव्याने संग्रहात दाखल झालेल्या पुस्तकांची यादी तिथे ‘प्रसिद्ध’ होते. जास्त ‘बोली’ लावणाऱ्याला प्रत्येक पुस्तक मिळतं. एकेकाळी विक्रेते पुस्तकाचं स्वरूप आणि वजनावर त्याची किंमत सांगत असत. आता त्यांचं ‘मूल्य’ चांगलं कळत असल्यामुळे पुस्तकांना भरपूर किंमत मोजावी लागते. अर्थात, विक्रेता आणि ग्रंथप्रेमी ग्राहक यांना एकमेकांबद्दल खूप आदर असतो आणि लाडक्या मुलीप्रमाणे चांगली पुस्तकंसुद्धा ‘सुस्थळी’ पडावीत अशी काळजी विक्रेते घेतात. अशा, रस्त्यावरील उपेक्षित विक्रेत्यांचा मध्यंतरी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये सत्कार करण्यात आला.

आमच्या घरात ४०००पर्यंत पुस्तके असतील. त्यांचे प्रमुख विषय - संस्कृत (संबंधी), अध्यात्म, तत्त्वज्ञान, प्राचीन इतिहास व पुरातत्त्व, तसेच इंग्रजी-मराठी कथा-कादंबऱ्या. सगळी वाचून झालेली नाहीत. ते शक्यही नाही. शब्दकोशही अनेक आहेत. संदर्भासाठी त्या सर्वांचा उपयोग होत असतो. नव्यानं खरेदी करायची नाही, असा कृतनिश्चचय केला तरी महिन्याला किमान १२-१५ पुस्तकांची घरात भर पडतच असते. नियतकालिकं वेगळी. शिवाय भेट म्हणून आम्हा दोघांना अनेक पुस्तकं मिळत असतातच. दोन ग्रंथालयांचा सदस्य आहे. बदलापूरच्या ‘ग्रंथसखा’चा तर (तिथल्या स्वायत्त मराठी विद्यापीठाचा) मार्गदर्शक आहे. तिथून कुठलीही आणि कितीही पुस्तकं मिळू शकतात. पुस्तकांच्या दुकानात आणि प्रकाशन समारंभात चांगली पुस्तकं दिसली की मोह आवरतच नाही. चांगल्या अर्थानं म्हणायचं तर ते गर्दसारखं व्यसन आहे. त्याचे दुष्परिणाम तर काहीच नाहीत. ज्ञान आणि मनोरंजनात चौफेर वाढच!

ही एक प्रकारची पुस्तकसिद्धीच आहे. म्हणजे आमच्याकडे पुस्तकं येतच राहतात. एखादं पुस्तक आपल्याला हवं आहे आणि सहजासहजी ते कुठेही उपलब्ध नसलं, तर येनकेनप्रकारेण ते मिळतंच. अगदी चमत्कार व्हावा अशा पद्धतीनं. आपण काही अभ्यास करत असलो, तर त्याला उपयुक्त असा संदर्भ ग्रंथ आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. संपादनासाठी, प्रस्तावना लिहिण्यासाठी किंवा प्रत्यक्ष प्रकाशनासाठी महत्त्वाचं पुस्तक हाताशी येतं. लेखक व प्रकाशक म्हणून ‘सप्रेम भेटी’ येतात हे वर सांगितलंच आहे. अणिमा, लघिमा, गरिमा अशा आठ प्रकारच्या महासिद्धी मानल्या जातात. तशी नववी म्हणजे पुस्तकसिद्धी! पुस्तक ही एक जड वस्तू नसून, ते चैतन्यमय असतं, असा माझा विश्वास आहे. त्यामुळे ते आपल्या हाकेला ‘ओ’ देतं.  

वाढतं वय, जागेची टंचाई आणि पुढच्या पिढीला स्वारस्य नसल्याने घरातील संग्रहाची ‘सोय’ लावावी लागते. अनेक मार्गांनी आमच्याकडे हजारो पुस्तकं जमा झालेली आहेत. त्यातली निवडक स्वत:कडे ठेवून, बहुतांशी मोठ्या ग्रंथालयापासून नव्याने उभ्या राहणाऱ्या वाचनालयांना भेट म्हणून दिलेली आहेत. ‘ग्रंथसखा’कडे हजारोंच्या संख्येनं दुर्मीळ पुस्तकं आलेली आहेत. त्यांनीही योग्य ठिकाणी त्यांचं वितरण केलेले आहे. वैयक्तिक ग्रंथसंग्रह वाढावा आणि ग्रामीण, दुर्गम भागात नवीन वाचनालयं उभी राहावीत, यासाठी आमचं काम चालू आहे. लोकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कोणाला आपला ग्रंथसंग्रह सुयोग्य ठिकाणी भेट द्यावा अशी इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. पुस्तकं नेण्याची आणि त्यांची चांगली व्यवस्था लावण्याची जबाबदारी आमची. एखाद्या विशिष्ट पुस्तकाची माहिती हवी असेल, तर ती पुरवण्याचा प्रयत्नही आम्ही करतो.

‘एकमेकां साह्य’ करून बदलत्या वाचनसंस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी आपण झटू या!

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZOLBQ
 A nice write up with a particular touch of Ravindra Gurjar.
Please keep it up Ravi.1
 Very informative indeed ! I too am a book lover hence I liked the article so superbly drafted !
Manohar Sapre1
 केवळ अप्रतिम !!! एक ग्रंथपाल म्हणून हा लेख वाचत असताना मला मी पुस्तकात कशी हरवून जाते हे आठवले.खरचच मस्त वाटलं .1
 A nice write up,plz keep it up sir...


VAN
 खुप छान लेख. आवडला.
Similar Posts
देशातील एक आदर्श साहित्य-संस्कृती केंद्र साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या प्रेरणेतून दोन ऑक्टोबर १९११ रोजी पुणे मराठी ग्रंथालया ची स्थापना झाली. हे ग्रंथालय केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील अग्रगण्य ग्रंथालय आहे. प्रामाणिक, निष्ठावान आणि सेवाव्रती कार्यकर्त्यांच्या अखंड परिश्रमांमुळे संस्थेची अखंड प्रगतीच होत आली आहे. या ग्रंथालयाबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर
उपनिषदांचे अंतरंग वेद, उपनिषदे म्हणजे ज्ञानाचे प्राचीन भांडार आहे. यातील उपनिषदांचे अंतरंग उलगडून सांगत आहेत ज्येष्ठ लेखक, अनुवादक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरातून...
‘माझे जीवनगाणे’ ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र वसंत गुर्जर यांनी आज (२९ एप्रिल २०१८) ७३व्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने त्यांच्या ‘किमया’ सदरात त्यांनी स्वतःच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा...
भर्तृहरीचे नीतिशतक – पूर्वार्ध कालिदास, बाण, भवभूती, माघ आणि श्रीहर्ष हे पाच संस्कृत महाकवी होऊन गेले. त्याच परंपरेतील भर्तृहरीची शतकत्रयी शतकानुशतके लोकप्रियता टिकवून राहिली. आजही त्यांचा अभ्यास होत असतो. त्यातील ‘नीतिशतका’बद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर, त्यांच्या ‘किमया’ या सदरात... आज पूर्वार्ध...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language